Activities Details

Gujarath Mahasangh Sabha

19/01/2020

काल दि. १९ जानेवारी २०२० रोजी सुरत येथे गुजराथ स्थित महाराष्ट्रिय लेवा पाटीदार महासंघाच्या स्थापना कार्यक्रमात पाहुणा म्हणून सहभागी होतो. एक सुरेख कार्यक्रम अनुभवायला मिळाला. कार्यक्राची सुरुवात दीपप्रज्वलनानंतर सुंदर अशा गणेशवंदना न्रुत्याविष्काराने झाली. कार्यक्रमात विविध शहरातील भगिनी वर्गांनी साकारलेल्या खालील तीन समाज प्रबोधनात्मक नाटिका त्यांचे उत्क्रुष्ठ स्क्रिप्ट, सादरीकरण व अभिनय यांनी बहारदार झाल्या. १) बेटी बचाव २) प्लस्टिक मुक्ती ३) पारंपरिक नणंद व आधुनिक भावजय यांच्या संवादाचे द्वंद्व. स्वर्गीय किशोरकुमारजींच्या आवाजाशी साध्यर्म असलेल्या आवाजात आपल्या समाजबांधव कलाकाराने गाईलेली किशोरकुमारांची फिल्मी गीते सर्वांना आश्चर्याने अचंबित करणारी होती. पत्रकार श्री तुषार वाघुळदे यांनी समाज सुशिक्षित झाला परंतु सुसंस्कारित झाला नाही याबद्दल खंत व्यक्त केली व महासंघाच्या ह्या माध्यमातून समाजबांधवांनी संस्कार व संघटनास हातभार लावावा असे आवाहन केले. कार्यक्रमास थोड्या वेळासाठी सुरत येथील आमदार सौ पाटील यांनी हजेरी लावली व समाजबांधवांना सहकार्याचा संदेश दिला. त्याव्यतिरिक्त कार्यक्रम हा महाअधिवेशन अध्यक्ष श्री सुनील पाटील व प्रमुख पाहुणे डॉ प्रमोद महाजन (नाशिक) यांचे समाजबांधवा संबोधून केलेले स्फूर्तिदायक, प्रबोधनात्मक व प्रेरणादायी संबोधन हे होते. महासंघ अध्यक्ष श्री सुनील पाटीलजी यांनी संघटनाची आवश्यकता व त्यासाठीचे प्रयत्न विषद करतांनाच भविष्यात त्याची देशस्तरावर व्याप्ती वाढवण्याचा संकल्प केला. प्रमुख पाहुणे डॉ प्रमोद महाजन यांनी समाजबांधवांनी नित्यनेमाने स्वचिंतन करणेची सवय अंगिकारावी. परस्परातील सुसंवाद आणि भेटीगाठी वाढवाव्या. आपण समाजाला काय दिले याबाबत प्रत्येकाने स्वत: प्रामाणिक चिंतन व पुनरावलोकन करावे यासाठी जोशिले आवाहन केले. कार्यक्रमास भुसावळ, पुणे, नाशिक आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून समाजप्रेमी मंडळी हजर होती. सुरत, वापी, भरुच, अंकलेश्वर, नवसारी, अहमदाबाद येथील समाजमंडळ प्रतिनिधी व मोठ्या प्रमाणात ह्या परिसरातील समाजबांधव उपक्रमास हजर होते. महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे अंदाजे १६०० ते १८०० समाजबांधवांची कार्यक्रमास उपस्थिती होती यांत ५०% किंवा किंचित जास्त प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी वरणबट्टी, वांग्याची भाजी, भात व आमसूल कढी असा बेत होता.डायमंड सिटीत ऐतिहासिक ठरले गुजरातचे अधिवेशन : अखिल गुजरात महाराष्ट्रीयन लेवा पाटीदार महासंघ आयोजित अत्यंत ऐतिहासिक अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात नुकतेच संपन्न झाले.. पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला , सर्व समाजबांधव एकोप्याच्या भावनेने आवर्जून उपस्थित राहिले , हे विशेष ..!! समाजाच्या उन्नतीसाठी , अस्तित्वासाठी , संस्कृतीसाठी , वारसा जतन करण्यासाठी , समाजाच्या सन्मानासाठी , कुटुंब भावनेसाठी , संघटनसाठी आणि आपल्यातील अंतर दूर करून संघटित होण्यासाठी हे अधिवेशन झाले ..अधिवेशनात एकत्रीकरणावर भर देण्यात येऊन लग्न कार्यावरील खर्चावर नियंत्रण बसावे , लग्नाळू मुले , मुली , चुकीच्या चालीरीती , घटस्फोटाच्या वाढत्या समस्या , ज्वलंत प्रश्न , नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाकडे वळणे , केवळ शिक्षण न बघता सुसंस्कृत पाहून लग्न ठरविणे , वाढत्या वयाची चिंता , बेरोजगारी तसेच मतभेद , मतभेद व प्रांतीय वाद न करता आपण सगळे एकच आहोत ही भावना अंगिकारण्यासाठी एकसंघ होणे यावर सांगोपांग चर्चा झाली , त्यास सर्वानुमते मान्यताही देण्यात आली... हे विशेष !! आता फक्त समाजाच्या कल्याणासाठी , भल्यासाठी एक ताकद निर्माण करण्याचा सूर सर्वांमध्ये उमटला .. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून अनेक मान्यवर उपस्थित होते.. त्यात विचारवंत डॉ. प्रमोद महाजन , नाशिक , जळगावचे जेष्ठ झुंजार पत्रकार , कलावंत व सामाजिक कार्यकर्ते तुषार वाघुळदे , खत्री समाजाचे नेते उद्योजक कांतीलाल चौटे , सुरतच्या आमदार सविताताई पाटील , पुणे भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष व उद्योगपती रवींद्र चौधरी , लेवा युवा फाउंडेशनचे निलेश महाजन , भुसावळ , नाशिकच्या सामाजिक चळवळीतील सुहास कोल्हे , सुनील ढाके , गीता नेहते मॅडम , ललित वायकोळे सांगवी पुणे , नवसारीचे व्यावसायिक डॉ.श्री. कोळंबे , आयोजन मंडळातील धुरंधर संघटक व गुजरात राज्याचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी पाटील , बडोदा व्यावसायिक भास्करभाऊ चौधरी , वापी , अंकलेश्वर- भरूचचे अध्यक्ष प्रवीण झाम्बरे , अजित पाटील , सिल्व्हासा , सुरत लेवा मंडळाचे सर्वेसर्वा व उद्योजक भगवानभाऊ खर्चे , नवसारीचे नगरसेवक श्री. अत्तरदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती .. अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.. प्रास्ताविकात भास्करदादा म्हणाले , गुजरात राज्यातील आपला समाज आता अनेक वर्षांपासून एकत्र येतोय , किंबहुना त्यांनी सकारात्मकता दाखवलीय हाच आनंद आहे , असे सांगून अधिवेशन घेण्यामागचा हेतू स्पष्ट केला. अत्यंत झंझावती आणि तळमळीने केलेल्या भाषणात समाजाची मुलुख मैदान तोफ पत्रकार व कलावंत तुषार वाघुळदे आपल्या खास शैलीत समाजबांधवांना अभिवादन करून म्हणाले , वऱ्हाडी , आरपट्टी- पारपट्टी आणि प्रांतीय वाद न करता तसेच उपजाती ( थोरगव्हाणे , नवघरे , कंडारीकर ) असा भेदभाव न मानता फक्त आपण लेवा एक लेवा च आहोत , याचे भान ठेवून एकत्र या , गुण्यागोविंदाने नांदा असे ठामपणे सांगितले , श्री. वाघुळदे आपल्या प्रखर भाषणात पुढे म्हणाले की , " आज या अधिवेशनाच्या निमित्ताने नर्मदा , तापी , मुठा, मुळा, गिरणा , गोदावरी , आणि सातपुड्याच्या पट्ट्यातील इतर उपनद्यांच्या किनाऱ्यावरील समाज बांधव स्वखर्चाने एकत्र आलाय , ही खूप आनंदाची बाब असून भविष्यातील एक चांगली नांदीच आहे" .. ज्यांच्याकडे मनाचे सामर्थ्य असते , त्यांना यश मिळतच असते , आपला समाज हा देश- विदेशात विखुरलेला असून केवळ जिद्द, अपार कष्ट व हिंमतीच्या जोरावर आपले नाव उज्वल करीत आहे , ही बाब निश्चितच अभिमानाची आहे. श्री.तुषार वाघुळदे पुढे म्हणाले , आपलेच काही स्व- जातीय लोक मते - मतांतरे घडवून आणतात ,अर्थात समाज म्हटला की विचारप्रवाह हे वेगवेगळे असू शकतात. चांगले कार्य करणाऱ्यांना काही जण नकारात्मकता दाखवित खेकडावृत्तीसारखे वागतात , असे अस्तित्वासाठी चांगले नाही. तशी कृती थांबण्याची गरज आहे ; नाहीतर समाजात कडवटपणा वाढीस लागेल सामाजिक एकोप्याची वीण घट्ट करा , संकटावर मात करण्यासाठी आपले अस्तित्व टिकविण्यासाठी एकता गरजेची आहे असेही त्यांनी सांगितले. गुजरात राज्याचे अध्यक्ष श्री. सुनीलजी पाटील म्हणाले , राज्यातील समाज बांधवांसाठी मी जीवनाच्या अंतिम श्वासाप्रयन्त समाजाच्या अडी-अडचणीसाठी सामाजिक बांधिलकी जपेन. भविष्यात अखिल भारतीय लेवा समाजाचे अधिवेशन घेण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.. भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते निलेश महाजन म्हणाले , सामाजिक कार्य करतांना अनेक अडी-अडचणींना सामोरे जावे लागते , समाजाच्या उत्थानासाठी माझे नेहमीच सहकार्य राहिलेले आहे , एकजूट होऊ या , आणि जगाला आपली ताकद दाखवू या असे आवाहन केले.. अध्यक्षीय भाषणात जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रमोददादा महाजन म्हणाले , आपण आपल्या मुलांना उच्चशिक्षण न देता नाते संबंधाचे शिक्षण व जुळवून घेण्याचे शिक्षण द्यावे . समाजकार्यात त्यांचा सहभाग वाढवावा , त्यामुळे कुटुंब सुखी होईल. आपल्या समाजात बहुतेकांना सामाजिक जीवनाच्या दुःखाच्या खूप समस्या आहेत . आपणच जर बहुसंख्य लोक जर सामाजिक जीवनाच्या रोगाने पीडित असू , तर समाजाला आपण कसे बरे सुधारणार ? स्वतःच्या चुका व इतरांच्या चुका या दोघांनाही माफ करा , आपले सामाजिक कर्तव्य स्वतःहून उत्साहाने करत रहा , जेणेकरून समाज सुखी होईल व समाजाच्या समस्या सुटण्यास मदत होईल ; आणि एकी टिकण्यास मदत होईल.. भगवानभाऊ खर्चे यांनी समाजातील वास्तव निर्भीडपणे व्यक्त केले. समाजातील चुकीच्या होत असलेल्या गोष्टींकडे त्यांनी रोष व्यक्त केला.श्री. रवींद्र चौधरी ( पुणे ) यांनी समाजात दुफळी निर्माण न होता अस्तित्वासाठी एकत्र या आणि आपली शक्ती , संघटन वाढवा असे नम्र आवाहन केले . याप्रसंगी अंकलेश्वरचे अध्यक्ष श्री.झाम्बरे यांनीही समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येण्याची हीच वेळ असल्याचे प्रतिपादन केले. आमदार संगीताताई पाटील , सुरत महापालिकेच्या स्थायी समिती सभापती छोटुभाई पाटील , बांधकाम समिती सभापती सोमनाथ मराठे , सुरत लेवा मंडळाचे उपाध्यक्ष किशोर बऱ्हाटे , उत्तम पाटील , सुधाकर राणे , प्रभाकर बोरोले, सोपानदेव मुरारी पाटील , नाशिक , डॉ. गोविंद बोरोले , पुरुषोत्तम पिंपळे , पुणे , सतीश महाजन , सौ. नेहते , हर्षल जावळे, नाथुभाऊ पाटील , कल्पना महाजन , सौ. खर्चेताई आदी उपस्थित होते . आमदारांनीही अधिवेशनाला शुभेच्छा दिल्यात.पाटीदार समाज खूपच मेहनती आणि , जिद्दी असल्याबद्दल गौरवोद्गार काढले. या अधिवेशनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. प्रारंभी श्री गणेश वंदना सादर झाली. काही कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्वलंत समस्येवर प्रकाशझोत टाकण्यात येऊन , बेटी बचाव , प्लास्टिक बंदी एकपात्री नाटक , कांदा ने केला वांधा यावर शुभांगी सरोदे यांनी काव्य सादर केले , सादर करण्यात आलेल्या कलाकृतींना प्रेक्षकांनी दाद दिली ..वापीच्या महिला कलावंत सुवर्णा बेंडाळे आणि जयश्री भंगाळे यांनी " नणंद भावजायचा सुसंवाद " ही विनोदी ढंगातली नाट्यछटा चांगलीच रंगवून धम्माल केली. सामाजिक आत्मभान ठेवत श्री. सुहासजी बऱ्हाटे व श्री. सिंधुताई बऱ्हाटे यांच्याकडून जेवणाची उत्तम व्यवस्था , नियोजन , खान्देशी ( लेवा मेनू ) चा स्वाद खूप खुमासदार होता. आमसूल कढीने तर रंगत आणली. सर्व समाज बांधवांच्या साक्षीने बऱ्हाटे दाम्पत्यांचा मोमेंटो , साडी- चोळी देऊन यथोचित गौरव करण्यात आला. वापी महिला मंडळाच्या अध्यक्षा,सौ. माधुरी नेमाडे (महिला मंडळ,वापी), सौ. निता राणे (महिला मंडळ सिल्व्हासा),सौ. जयमाला लोखंडे—सौ माधवी पाटील (बडोदा) , व त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी अधिवेशनात हिरीरीने सहभाग नोंदविला .सुरतचे सामाजिक , सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्त्या व माजी नगरसेविका छायाताई पाटील, मोना बोरोले , वर्षा वाणी यांनी सर्व महिलांसाठी हळदी कुंकुचे आयोजन करून परिचय करून घेतला व सुसंवाद साधला .त्यांचे मनस्वी कौतुक व अभिनंदन ..! कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कविता चौधरी , अर्चना चौधरी आणि पूनम पाटील यांनी तर आभार वापीचे अशोक जावळे यांनी मानले.. या अत्यंत ऐतिहासिक व कायम स्मरणात राहील अशा समाजमेळाव्यासाठी हजारो समाज बांधव- भगिनी , जेष्ठ नागरिक , युवक- युवती यांची विशेष उपस्थिती होती..एक आनंदाची बाब म्हणजे आलेल्यांमध्ये एकोप्याची भावना दिसून आली , खेळीमेळीच्या वातावरणात गुजरात अधिवेशन संपन्न झाले.